"मी भारताच्या पंतप्रधानांशी बोललो आहे. आमच्यात चांगली चर्चा झाली. त्यांनी आम्हाला मलेरियावर परिणामकारक ठरणारं औषध पाठवलं तर चांगलं होईल. पण त्यांनी तसं नाही केलं तर साहजिकच अमेरिकेकडून प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जाईल." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केलं.
अमेरिकेने भारताकडे हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीन या औषधाची मागणी केली आहे. या मागणीवर भारत सरकारच्या मंत्रीगटाच्या आज होत असलेल्या बैठकीत विचार आणि निर्णय होऊ शकतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या मंत्रीगटाचे अध्यक्ष आहेत. या बैठकीपूर्वी परराष्ट्रमंत्रालयाने असं म्हटलंय की, 'भारतावर अवलंबून असणाऱ्या भारताच्या शेजारी देशांना पॅरासिटामॉल आणि हाइड्रॉक्सीक्लोरिक्वीन या औषधांचा 'योग्य त्या प्रमाणात' पुरवठा केला जाईल.' वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार परराष्ट्रमंत्रालयाने 'कोव्हिड19 चा फटका बसलेल्या इतरही काही देशांना या औषधांचा पुरवठा केला जाईल.'