वाघिणीला कोरोनाची लागण तर एक वाघ आयसोलेशनमध्ये

जगभरात 12 लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पण आता अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात असलेल्या 4 वर्षांच्या वाघिणीलाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी आली आहे.


न्यूयॉर्क शहरातील 'द ब्राँक्स' प्राणीसंग्रहालयातील एका वाघाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती राष्ट्रीय पशुवैद्यक सेवेच्या लॅबने दिली आहे.


नादिया नावाच्या वाघिणीला कोरोनाची बाधा झाली आहे. तिची बहीण अझुल, इतर दोन वाघ आणि तीन अफ्रिकन सिंह यांना कोरडा खोकला येत होता.


प्राण्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या माहितीतून या प्राण्यांना कोरोनाची बाधा तर झाली नाही ना अशी प्राणीसंग्रहालय प्रशासनाच्या मनात शंका आली.


आम्ही नादियाची चाचणी काळजीपोटी घेतली. पुढे या व्हायरसविषयी जी काही माहिती आमच्या हाती लागेल ते आम्ही कळवत राहू", असं प्राणीसंग्रहालयाने म्हटलं आहे.


प्राणी संग्रहालयातील काही प्राण्यांची भूक कमी झाल्याचं लक्षात आलं आहे. त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे.


'किंग स्टार' नावाच्या वाघाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.


प्राणी संग्रहालयातील चार वाघ, हिमबिबळ्या, चित्ते, क्लाउडेड लेपर्ड, अमूर लेपर्ड यांच्यात आजाराची कोणतीही लक्षणं नसल्याचं प्राणीसंग्रहालयाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.


नादियाला कोरोनाची लागण कशी झाली याचा आम्ही शोध घेत आहोत. कारण प्रत्येक प्रजातीची व्हायरसचा प्रतिकार करण्याची क्षमता वेगळी असते. यापुढे सर्व प्राण्यांवर आम्ही विशेष लक्ष ठेवणार आहोत असं त्यांनी सांगितलं.


प्राण्यांची काळजी घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून ही लागण झाली आहे. त्या कर्मचाऱ्याकडून हे अजाणतेपणे झालं आहे. त्या कर्मचाऱ्याला जोवर कोणतीही नव्हती तोवर तो कामावर येत होता असं प्राणीसंग्रहालयाने सांगितलं.