जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण 31 डिसेंबर 2019 ला आढळला. वेगाने व्हायरस पसरत गेल्याने 30 जानेवारी 2020 रोजी या साथीला आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आलं.
पण सुरुवातीला याच्याबाबत जास्त माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळेच त्यावरची लसही मिळू शकली नाही.
आतापर्यंत या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कोणतीही लस तयार झालेली नाही.
याचा प्रसार कसा होतो, याची माहितीही आता उपलब्ध आहे. पण उपाय अजूनपर्यंत मिळालेला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देशांमधले डॉक्टर याच्यावरची लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण याची लस लगेच बनू शकेल का?
कधी बनेल कोरोना व्हायरसची लस?
या विषाणूवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, त्यांनी याची लस बनवली आहे. प्राण्यांवर याची चाचणीही घेण्यात येत आहे.
प्रक्रिया योग्य पार पडल्यास याच वर्षी माणसावरही याची चाचणी घेण्यात येऊ शकते.
पण लस तयार केली असली तरी याचं उत्पादन करण्यास आणखी वेळ लागू शकतो.
त्यामुळे याच वर्षी कोरोना व्हायरसची लस बाजारात येईल किंवा नाही याबाबत सांगू शकत नाही.
कोरोना व्हायरससंबंधित संशोधन अत्यंत वेगाने होत आहे. लस बनवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आजमावून पाहिले जात आहेत. सध्यातरी याबाबत खात्रीने सांगणं शक्य नाही.
मानवी शरिरात संसर्ग होऊ शकणारे चार प्रकारचे कोरोना व्हायरस आतापर्यंत सापडले आहेत. या व्हायरसमुळे सर्दी, खोकल्यासारखी लक्षणं दिसतात.