इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ICU मध्ये दाखल

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना इंटेन्सिव्ह केअर यूनिट अर्थात ICU मध्ये दाखल करण्यात आलंय.


बोरिस जॉन्सन यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे 27 मार्च रोजी लक्षात आले होते. त्यानंतर ते होम क्वारंटाईन होते. मात्र, तापासह काही लक्षण कायम राहिल्यामुळे त्यांना रविवारी (5 एप्रिल) संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांना ICU मध्ये हलवण्यात आलंय.


'सर्व सूत्र अजूनही पंतप्रधानांच्याच हाती'


स्वतः पंतप्रधान हॉस्पिटलमध्ये आहेत, मग सध्याच्या परिस्थिती देश कोण चालवतंय, असा प्रश्न बीबीसीच्या प्रतिनिधी लॉरा कुएनसर्ग यांनी यूकेचे परराष्ट्र मंत्री डॉमिनिक राब यांना विचारला.


त्यावर उत्तर देताना राब यांनी म्हटलं, की "लक्षणं कायम असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या करून घेण्यासाठी पंतप्रधान हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. मात्र त्यांची प्रकृती नीट आहे आणि अजूनही सर्व सूत्रं त्यांच्याच हातात आहेत."



लॉकडाऊन खरंच परिणामकारक ठरत आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना प्रोफेसर अँजेला मॅकलीन यांनी म्हटलं, की सध्या करण्यात आलेल्या उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी संसर्गाच्या प्रत्येक टप्प्याची आकडेवारी तपासावी लागेल. आताच त्याबद्दल काही बोलणं हे फार घाईचं ठरेल, असंही मॅकलीन यांनी म्हटलं.


लोकांनी उपाययोजनांचं काटेकोरपणे पालन केलं, तर तीन आठवड्यांनंतर लॉकडाऊनचा खरंच परिणाम झाला का, हे सांगता येत असल्याचं अँजेला मॅकलीन यांनी सांगितलं.


एका पंतप्रधानांच्या दुसऱ्या पंतप्रधानांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना ट्वीट करून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


बोरिस जॉन्सन लवकर बरे व्हावेत - ट्रंप


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमधून प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये बोरिस जॉन्सन लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.


सर्व अमेरिकन नागरिक ते बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. ते माझे चांगले मित्र आहेत, ते एक उत्तम व्यक्ती आणि उत्तम नेते आहेत. ते कणखर असून लवकरच बरे होतील अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना कळवल्या आहेत.


लेबर पार्टीचे नेते कायर स्टार्मेर यांनीही जॉन्सन लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.



राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं त्याआधीच स्पष्ट झालं होतं.


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत "बोरिस जॉन्सन हे योद्धा आहेत, ते या आव्हानाला तोंड देतील," अशी प्रार्थना केली होती.


चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 195 देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात सुमारे 4 लाख लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 17 हजारपेक्षा जास्त आहेत.


या व्हायरसचे सगळ्यात जास्त बळी आता इटली, चीन आणि स्पेनमध्ये आहेत. त्यामुळे एकीकडे चीनमध्ये गोष्टी पूर्ववत होत असतानाच युरोप सध्या कोरोना उद्रेकाचं केंद्र बनलं आहे.